सावलीचा आडोसा
भरून पावलं,
देऊ केलास सावलीचा आडोसा..
पण हाच तर आहे
मोठा दुर्विलास दैवाचा,
दुसऱ्याला आधार देण्याचं
नुसतं सोंग आणायचं झालं तरी
लपवावे लागतात डोळ्यातले पाझर
आणि काळजातले सुद्धा..
..
स्वत:ची अगतिकता
असहाय दुर्बलता
दाखवायची नसते जगाला
नाहीतर..
तुम्ही कुणाला आधार देऊ शकता
यावर विश्वास बसत नाही कुणाचा,
प्रयत्न करताच झिडकारलं जातं
अंगावर बसलेल्या
एखाद्या क्षुद्र किड्यासारखं..
..
येणार असशील तू
आता जर साथ द्यायला,
मग मात्र मी नक्कीच पाहणार नाही
मागे वळून कोणाकडे..
आणि एक भरोसा बाळग मनात
तुझ्या जीवनशक्तीवर,
जिच्यामुळे फुटणार आहेत नवे धुमारे
वादळात हेलावलेल्या बुंध्याला..
मग कशाला पर्वा करायची
भकास आकाशाची ?
..
तुझ्याच पालवीने आकर्षित होऊन
येतील इथे श्रावणमेघ
हिरव्या स्वप्नावर शिडकावा करायला,
तेंव्हा मात्र त्या पावसात
मला गरज भासेल आडोश्याची,
तुझ्या सावलीची..
नाहीतर मीही चिंब भिजेन
तुझ्याबरोबरच त्या पावसात..!
-सौ.कल्याणी / २५ मार्च २०११
No comments:
Post a Comment