एक झाड होते सुरकुतलेले
कोंब होउनी रुजले जेव्हा
आभाळाशी ईर्ष्या धरलेले
बालपणाचा अंकुर कोवळा
स्वतःच पायी तुडवून उठलेले
एक झाड होते सुरकुतलेले
एक झाड होते सुरकुतलेले
तारुण्याच्या उन्मादी होते
सूर्याशी त्याने वैर ही केले
हट्टाला व्यर्थची पेटून आपली
सख्खी पाने जाळून बसलेले
एक झाड होते सुरकुतलेले
एक झाड होते सुरकुतलेले
आयुष्याच्या संध्याकाळी
पश्चात्तापी बुडून गेले
कळले नाही माथ्यावारुनी
कधी सोबती उडून गेले
एक झाड होते सुरकुतलेले
एक झाड होते सुरकुतलेले
-अभिषेक मु. प्रभुदेसाई
No comments:
Post a Comment