Monday, March 28, 2011

माझ्या सासूची महती ।

माझ्या सासूची महती ।

माझ्या सासूची महती । शब्दांनी वर्णावी किती ।

मी बापडी अल्पमती । थोडासा प्रयत्न माझा ॥



डोळे सारखे वटारलेले । जणू निखारे पेटलेले ।

पाहताच शब्द खुंटले । मी मुकी राहते ॥



प्रत्येकाच्या चुका काढी । गप्प बसल्या उगाच खोडी ।

उत्तर देता बेदम फोडी । जिभेच्या पट्ट्याने ॥



चहा नाश्ता ठरल्या वेळी । अन्यथा शब्द बंदूकगोळी ।

खाती तव्याची गरम पोळी । चुलीपाशी बसूनी ॥



येताजाता चकली चिवडा । फरसाण भजी आणि वडा ।

रात्री ओवाहिंगाचा काढा । अजीर्ण होते म्हणूनी ॥



बामच्या डब्या पिवळ्यानिळ्या । उगाळण्या मात्रा मुळ्या ।

खोकून कफाच्या गुठळ्या । हवे तिथे थुंकती ॥



मुलावरती प्रेम फार । त्यांच्या मते सून चुकार ।

सारखा होतो उद्धार । माझ्या माहेराचा ॥



तोही बने आईचा बाळ । मान खाली, दिसे मवाळ ।

माझ्यासाठी शब्दांचा दुष्काळ । चुकले नाही तरी ॥



मोकळ्या हवेची गोडी । फिरायला लेकाची गाडी ।

दोघांचा बेत लगेच ताडी । येती खो घालाया ॥



दोघांनी कधी निवांत बसावे । डोळ्यांनी प्रेम बोलावे ।

यांचे बीपी लगेच वाढावे । नको त्या वेळी ॥



बिचारे सासरे मौन असती । हळूच मला सांत्वना देती ।

खुणेनेच मला सांगती । त्यांना काय हवे ते ॥



असे आहे सासूपुराण । मिळाले प्रारब्धाचे वाण ।

संपणार नाही वर्णन । किती लिहिले तरी ॥



-सौ.कल्याणी / २४ मार्च २०११

No comments:

Post a Comment