Monday, March 28, 2011

सासू दशक (आदर्श सासू लक्षण)

सासू दशक (आदर्श सासू लक्षण)


(सर्व सुनांबद्दल मनोमनी सद्भावना ठेवून...)


जसे बांधलेले तिने कन्वटीला

शिकूनी तुम्ही गंडवावे पतीला ।

जिच्या वागण्यातून युक्ती कळावी

अशी ’गोड’ सासू तुम्हाला मिळावी ॥१॥


कधी गोड बोलूनिया काम होते

कधी उंच पट्टीत गेल्या जमे ते ।

स्वरांच्या रियाजास संथा मिळावी

अशी ’गोड’ सासू तुम्हाला मिळावी ॥२॥


कधीही कुणाचीच तारीफ नाही

तरी काम काढावया वाहवाही ।

शिकूनी अशी धोरणी युक्ति यावी

अशी ’गोड’ सासू तुम्हाला मिळावी ॥३॥


सदा पित्त हो आवळेपाक खाई

बटाटेवड्याच्या दुकानात जाई ।

नव्या रोज शोधून रोगा, कण्हावी

अशी ’गोड’ सासू तुम्हाला मिळावी ॥४॥


सुने पाककौशल्य यावे म्हणोनी

सदा वेगळाले बहाणे करोनी ।

स्वत: चूल सांभाळण्याला न यावी

अशी ’गोड’ सासू तुम्हाला मिळावी ॥५॥


मुले एकटीनेच मी वाढवीली

सुनेला करायास का धाड झाली ?

सदा मालिका पाहण्याला बसावी

अशी ’गोड’ सासू तुम्हाला मिळावी ॥६॥


नटूनी फिराया निघे सांजवेळी

हिच्या मैत्रीणी रोज येती अवेळी ।

उणी एकमेका सुनांची पहावी

अशी ’गोड’ सासू तुम्हाला मिळावी ॥७॥


मुलीची मुले सर्वदा लाडवावी

करी हट्ट नातू, सुने बोल लावी ।

’नसे लेक माझा असा’ ती म्हणावी

अशी ’गोड’ सासू तुम्हाला मिळावी ॥८॥


’हिचे काय पाहूनिया भाळला हा ?

सुखाने मिळे ना, किती वाळला हा ?’

सदा काळजी ही मुलाची करावी

अशी ’गोड’ सासू तुम्हाला मिळावी ॥९॥


कमावून आणाल, पैसे मला द्या

नको एक पैसा हिशोबात वाया ।

तिजोरी नि खाती तिने बाळगावी

अशी ’गोड’ सासू तुम्हाला मिळावी ॥१०॥


-(भुजंगप्रयात)

- स्वामीजी २४-३-११

No comments:

Post a Comment