सासू किती गोड!बायको म्हणते मला, "एकदा तरी बोल..
माझी सासू किती किती गोड..!
सासरी जातोस तेव्हा कसली चंगळ असते
कशी तुझ्या राहण्याची बडदास्त ठेवते
तुला विचारूनच सगळा स्वयंपाक करते
तुझ्यासाठी खास कमी तिखट घालते
तोंडावर नाही तर माझ्याकडे बोल..
माझी सासू किती किती गोड..!
मी तुझ्यावर चिडलेय हे ती तुला सांगते
मला कसं पटवायचं हेसुद्धा शिकवते
चूक तुझी असली तरी मला झापून काढते
तुला समजून घेण्यासाठी मला समजावत असते
लाजेकाजेस्तव का होईना खरं खरं बोल..
माझी सासू किती किती गोड..!
तुलाही माहित आहे कुठे कुठे दुखतं
मुलीपासून दूर राहता मन कसं तुटतं
पुन्हा पुन्हा आतमधून काय भरून येतं
किती किती हुंदक्यांना पचवावंच लागतं
प्यायलेल्या आसवांचं जाणतोस ना मोल?
तुलासुद्धा वाटतं ना.. सासू किती गोड!
तुलासुद्धा वाटतं ना.. सासू किती गोड!"
....रसप....
२४ मार्च २०११
No comments:
Post a Comment