Saturday, March 26, 2011

आई….

आई….

आभाळात ढग दाटे

आले समुद्राकाठून

पाठवले का ग आई

तुझा सांगावा घेऊन



काळ्या ढगांची सावली

आई तुझी आठवण

डोळा ओथंबलं पाणी

झळ उन्हाची सोसून



आला श्रावण पहिला

माझं माहेर ते दूर

झोक्यावर गाणी गातो

तुझ्या मायेच्या ग सूर



काळजात सैरभैर

कधी मनात दाटते

तुझ्या पदराची छाया

खूप हवीशी वाटते



लग्न केलेस थाटात

दूर लेक पाठवली

मला निरोप देताना

का ग घालमेल झाली



सकाळच्या वेळी येतो

आठवणीचा आवेग

माझ्या अंगणी सजते

तुझ्या रांगोळीची रेघ



मन बावरून जाते

अंघोळीला पाणी घेता

घालतो ग न्हाऊमाखू

तुझ्या आठवांचा लोटा



फुले पूजेची घेताना

डोळे भरून येतात

अनायास तुझ्यासवे

नाम सहस्र ओठात



करी तयार न्याहारी

घास घशात ना जात

हवाहवासा वाटतो

तुझा फोडणीचा भात..



-सौ.कल्याणी / ऑगस्ट २००८

No comments:

Post a Comment