Monday, March 28, 2011

मना सज्जना सासू ऐशी असावी....

मना सज्जना सासू ऐशी असावी....

जगी गोड सासू अशी कोण आहे ?

विचारी मना तूची शोधूनी पाहे

जिच्या कौतुके जावया धाप लागे

तिचे पाद दोन्ही कुठे सापडावे ?



जिची सून स्तोत्रे म्हणाया थकेना

गुणांच्या मण्यांच्या गळा सात माळा

जिच्या एक शब्दी मिळे स्वर्ग सारा

अशी थोर सासू जगी दाखवा ना !



जगी जीस येती कराया चहाड्या

गुणां भागुनी दोष येती गुणाया

गणितात ऐशा गती थोर जिला

"सासू" उपाधी मिळे मात्र तिला !



परी अंतरी एक ध्यानी धरा रे

सासू अखेरीस माणूस आहे

तिच्या ह्या "गुणां" नेत्र काणा करावा

तिचा शब्द प्रत्येक हृदयी धरावा !



पतीला म्हणे जी "तुझी थोर आई"

अशी सून अन्ती पसंतीस येई

जिला जावई खुद्द घेऊन येतो

तिला "प्यार" होतो, जगी धन्य होतो !



मना ऐक रे मीही होणार सासू

कुणाला दिसावे तिचे नम्र आसू ?

उद्याची तयारी अताला करावी

जगी एक सासूच हाती धरावी.



शिकाव्या तिच्या चार युक्‍त्या-प्रयुक्‍त्या

तिला दोन गोष्टी मजेशीर द्याव्या

जगी थोर पुण्याई घेऊन आला

मिळे गोड सासू जगी ह्या तयाला !!



--प्रभा.

२४.०३.२०११.

.

No comments:

Post a Comment