Monday, March 28, 2011

माझ्या बेरकी मांजरा.

माझ्या बेरकी मांजरा.

रुणुझुणुत्या पाखरा, जा रे माझ्या माहेरा या "टिळा लाविते मी रक्ताचा" या चित्रपटातील गीताच्या चालीवर.



पहिला कोरस [चाल - घागर घुमू दे घुमू दे]



सासू येणार, येणार । आला ग बाई सांगावा

आता घरात, दारात । होईल रोज कांगावा



माझ्या बेरकी मांजरा । तुला लोण्याचा कटोरा

आली सासू माझी दारी । तिला "प्रसाद" दे जरा

माझ्या बेरकी मांजरा...................................॥ध्रु॥



सासू माझी द्वाड भारी । गोड कडूलिंबापरी

मुक्ताफळांच्या घोटांनी जीव होतो ग घाबरा

माझ्या बेरकी मांजरा...................................॥१॥



दुसरा कोरस [चाल - सौभाग्याचं लेणं गवर माझी लेवू दे]



अश्शी फणकारते बनेल माझी सासू ग

कद्धी यायचं नाही थोबाडावर हासू ग

माझ्या बेरकी मांजरा...................................



तोफ मुलुखमैदान । उडविते दाणादाण

जसा खौट खोबर्‍याचा तोंडी भरला तोबरा

माझ्या बेरकी मांजरा...................................॥२॥



तिसरा कोरस [चाल - सौभाग्याचं लेणं गवर माझी लेवू दे]

चांगलं काही बघता पोटात हिच्या दुखतं ग

माझं सौख्य डोळ्यांत कुसळावानी खुपतं ग

माझ्या बेरकी मांजरा...................................



जसा उंबरा ओलांडे । तशी कचाकचा भांडे

केले अंगारे-धुपारे । रोग नाही झाला बरा

माझ्या बेरकी मांजरा...................................॥३॥



-क्रांति

No comments:

Post a Comment