नवा संसार मांडला
शिकवणीची शिदोरी
घडे मनात मनात
माहेराची एक वारी
छोट्याछोट्या ग गोष्टीत
तुझी आठवण येते
मनाच्या या गाभार्यात
मंद समई तेवते
तुझ्या मायेची सावली
आधार या संसाराला
आठवणी नंदादीप
मनी उजेड ग झाला
निघताना तुझे बोल
खूणगाठ कायमची
गृहीणीच्या हातानेच
उभी भिंत ही घराची
घेतला ग तुझा वसा
कधी नाही उतणार
माझ्या नावेचा किनारा
मनी माहेर आधार
केस भरघोस माझे
ठेवलेस लाडावून
वेणी घाल, कुणा सांगू
हळू फणी फिरवून?
तरी सय येते पुन:
तुझ्या प्रेमाची ग आई
कोण हळूच म्हणेल
"शहाणी ग माझी बाई"
कापलं ग बोट माझं
कोण मलम लावील
घेत जवळ लाडाने
कोण धपाटा घालील?
प्रेम करी सासू माझी
एकुलते लेकसून
तरी तुझी जवळीक
नाही मनात अजून
काल रात्री कडेलोट
भाव अनावर झाले
तुझे नाव ओठांवर
त्यांच्या कुशीत शिरले!
-सौ.कल्याणी
No comments:
Post a Comment