Saturday, March 26, 2011

देव ५

देव ५

लहान असताना.. मीच जिंकायचो..

बुद्दीबळ खेळताना मजा यायची ..

कोडी सोडवताना पटकन सुटायची ..

माझीच सुटायची लवकर ..

स्वारी खूप जोरात असायची..

बहुतेक तो माझ्या बाजूने असायचा..



तेव्हा बरे वाटायचे

रोज नवे डाव ..रोज नवी चाल..

सरळ साधे हत्ती अन तिरपे छान उंट..

आता समजलं अवघड आहे..

कधी पैशांची उलाढाल कधी भविष्याचा सवाल ..

अन त्यातही कळत नाही कोण हत्ती कोण उंट..



तेव्हा माहित होतं अवघड आहे..

प्यादा म्हणून सुरु करून वजीर होणं ..

नंतर लक्षात आलं..

एकदा वजीर होऊन मेल्यानंतर..

दुसऱ्या कुठल्याशा डावात कुणी प्यादा म्हणून घेणं..

अन अवघड आहे प्यादा कोण अन वजीर कोण ओळखणं ..



तेव्हा कोडी सोपी होती बरं..

एक वाट सांगितली असेल आतून बाहेर जाणारी

तर ती एकच असायची ..

अन आपलं काम फक्त ती शोधून काढायची..

तो वाटेवर सोबत करायचा ..



आता लक्षात आलं अवघड आहेत कोडी..

वाटतं वाट एकचं आहे अन आहे खूप वाकडी..

वाकड्या वाटेवर गेलो ..कि लक्षात येतं

वाटा आहेत चार..

अन आपण दूर आहोत फार ..



काही कळत नव्हतं असं का होतंय ..

पण आता लक्षात आलंय..

जो आधी सोबत असायचा आता तोच कोडी घालतोय..

ज्याने बुद्धी दिली आहे आता तोच बळ लावतोय ..

त्याला माहित आहे.. कोडी सोडवायचा माझा वेग ..

अन माहित आहे माझ्या चालीची रेघ अन रेघ....



ठीक आहे ..लढू , दोन हात करू,हरलो तर हरू..

मला माहित आहे त्याचं हि सगळं..

तो लढणा-याला बळ देतो.. कोडी अवघड करून

बुद्धी बळकट करतो..चाली नवीन रचून ...

अन तो हरवतोच सगळ्यांना मरणरूप घेऊन..

अन लढून हरलेल्यांना जिंकवतो कीर्तिरूप ठेवून..



-विनायक...

२ जानेवारी २००९

No comments:

Post a Comment