Saturday, March 26, 2011

आई माझी

आई माझी

आज मलाच जाणीव

किती त्रास तुला झाला

माझ्यासारख्या द्वाडानं

जीव मेटाकुटी केला



माझे हट्ट पुरविता

स्वत:कडे लक्ष नाही

टळे जेवणाची वेळ

तरी मला घास देई



सणासुदीची पर्वणी

थाट पैठणीचा दिसे

किती खोड्याळ मी होते

हात पदराला पुसे



आज जरासं भाजलं

तुझी येते आठवण

मला साजुक वाढलं

हात आपले पोळून



कधी सर्दीखोकल्याचा

कांगावा मी फार केला

अचानक रात्री जाग

आई बसून उशाला



जळजळ तळपायी

कधी तिला त्रास होई

काश्याची मी वाटी घेता

मला पोटाशीच घेई



मोठ्या वर्गांचे निकाल

माझी पाहून प्रगती

तुझ्या डोळ्यात दिमाख

मला मिळावी पावती



माझ्यासाठी स्थळ पहा

लक्ष बारीक दिलेलं

जेंव्हा निश्चय हा झाला

तुझं जेवण उडालं



शेवटचे दोन मास

जेवताना एकसाथ

तुझा घास अडखळे

टक लावून पहात



माझ्या स्वप्नातच दंग

नाही पाहीलं वळून

तुझ्या डोळ्यातलं पाणी

राहे डोळ्यात खिळून



मोठ्या हौसेत दिसली

लगबग तयारीची

आज मला जाणवते

गलबल काळजाची..



गेल्या जन्माची पुण्याई

आई देवाजीचं देणं

जन्माला या घडवीते

आई जीवनाचं लेणं



समजूत घालताना

आई माझी मधाळ वाणी

थोपटून निजविते

आई माझी मंजुळ गाणी



येता प्रेमाला उधाण

आई मधाळ रसाळ

शिस्त लावताना तापे

आई चुलीतला जाळ



आई हळूच हसता

कुंदकळ्या फुलतात

कधी कटाक्ष तिरका

जाईवेली झुलतात



घर भरलेलं पाही

सुगरण ती नेटकी

कोन्याकोन्यात घराच्या

घमघमते केतकी



घरातल्या श्रीमंतीचा

कधी नाही ताठा केला

दारी मध्यान्ही चाहूल

आधी त्याला भिक्षा घाला



घरात मी एकुलती

नाही एकटी वाढले

गडीनोकरांच्या मुली

माझ्याबरोबरी केले



हंबरती चाहूलीनं

जनावरं गोठ्यातली

हातानेच घास घेती

तिच्या प्रेमाची भुकेली



तिच्या हातीचं जेवण

अन्नपूर्णा बरसते

तिचा साजरा शृंगार

महालक्ष्मी हरखते



तिला नेहमी काळजी

राहू नये काही उणं

घरादारावर फिरे

नजरेचं लिंबलोण



पावलात लगबग

काम करायाची घाई

तिच्या तालात नाचती

विठूराया रखुमाई



कधी निवांत दुपारी

डोळा तिचा ग लागला

बाबा मजेत म्हणती

शेषशायी पहुडला



किती सांगू मी वर्णन

जीभ थकणार नाही

मला एवढं कळतं

आई फक्त माझी आई!



-सौ.कल्याणी


No comments:

Post a Comment