Saturday, March 26, 2011

मी तर असहाय होतो

मी तर असहाय होतो

तेंव्हाही होतो

आत्ता सुद्धा आहे,

कदाचित पुढे सुद्धा असेन..

तरीही झाडाला आधार देण्याचा माझा प्रयत्न

सफल झाला होता ना !!



मान्य,

दुखरी फांदी कोसळली

हे माझंच अनवधान होतं,

आणि मला दुखापत होऊ नये म्हणून

तिने आपला बळी दिला..

तरीही बुंध्याला मी दिलेला आधार

भक्कम करून गेला

पुन्हा नवे धुमारे फुटण्यासाठी..



मी रडलो ओरडलो नाही

म्हणजे मला दु:ख झालंच नव्हतं का..?

त्यावेळी रडून मला

वाढवायची नव्हती

स्वत:चीच अगतिकता..

झालो खरा बाजूला

पण नव्हती तिथे बेपर्वाई,

खरं सांगू ?

डोळ्यात तराललेलं पाणी झटकायला

आडोसा लागतोच ना ?



सौ.कल्याणी / २५ मार्च २०११

No comments:

Post a Comment